काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अंधेरी पोटनिवडणुकीवर भूमिका केली स्पष्ट

0

मुंबई,दि.10: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अंधेरी पोटनिवडणुकीवर भूमिका स्पष्ट केली आहे. अंधेरी ( पूर्व ) विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक (Andheri East Bypoll Election) होत आहे. आमदार रमेश लटके यांचे 12 मे रोजी निधन झाले होते. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.

या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं ठाकरे गटाला (Shivsena) पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित देशमुख , प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते. शिवसेना सचिव विनायक राऊत , विधिमंडळ गटनेते अजय चौधरी , ॲड अनिल परब हे देखील उपस्थित होते.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जगदीश कुट्टी या काँग्रेस उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची 27 हजार मते मिळाली होती. यामुळं ठाकरे गटाला पाठिंबा देण्यावरुन मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर होता. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस शिवसेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेसला मदत करणार का असाही सवाल कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला होता. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला असताना मुंबई महानगरपलिका निवडणुकीअगोदर काँग्रेसला वोट बॅंक मजबूत करण्याची संधी असतांना शिवसेनेला मदत का? असाही प्रश्न काही नेत्यांनी उपस्थित केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here