‘स्थायी’चा सभापती कोण? प्रधाने, पाटील की चाकोते; राजकीय हालचालींना वेग!

0
बिज्जू प्रधाने आणि अविनाश पाटील

सोलापूर,दि.२५: सोलापूर महानगरपालिकेच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या ‘स्थायी समिती सभापती’ पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापतीसाठी नगरसेवक बिज्जू प्रधाने, अविनाश पाटील आणि नगरसेविका रंजिता चाकोते यांची नावे चर्चेत आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २०) उत्साही वातावरणात पार पडली. 

या सभेत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करत स्वीकृत नगरसेवक पदासाठी आठ जणांना संधी दिली आहे. महापालिकेच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवडही यावेळी जाहीर करण्यात आली. आता सर्वांचे लक्ष आगामी ‘स्थायी समिती सभापती’ पदाच्या निवडीकडे लागले आहे.

स्थायी समितीचे पक्षनिहाय बलाबल

नव्याने स्थापन झालेल्या स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत दिसून येत आहे. एकूण १६ सदस्यांपैकी:

भाजप: १४ सदस्य

शिवसेना: ०१ सदस्य

एमआयएम (AIMIM): ०१ सदस्य

भाजपकडे १४ सदस्य असल्याने सभापती पदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होणार हे निश्चित आहे. मात्र, पक्षात या पदासाठी एकापेक्षा जास्त इच्छुक असल्याने कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.

सभापती पदासाठी ‘हे’ तीन चेहरे चर्चेत

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपमधून प्रामुख्याने तीन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

१. नगरसेवक बिज्जू प्रधाने: मोठा जनसंपर्क तसेच कार्यकर्त्यांचे मोठे जाळे दिवस आण रात्र कधीही उपलब्ध या जोरावर प्रधाने यांचे नाव आघाडीवर आहे. कामाची जाण आणि प्रभागातील पकड ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

२. नगरसेवक अविनाश पाटील: तरुणांचे नेतृत्व आणि आक्रमक कार्यशैली यामुळे पाटील यांच्या नावाचीही मोठी चर्चा आहे. पक्ष नेतृत्वाकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळाल्यास पाटील यांचे पारडे जड ठरू शकते.

३. नगरसेविका रंजिता चाकोते: महिला प्रतिनिधी म्हणून रंजिता चाकोते यांच्या नावाचीही पक्षपातळीवर विचारणा सुरू आहे. त्या काँग्रेस एकनिष्ठ चाकोते घराण्यातून आलेल्या आहेत. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी पक्षाकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष

स्वीकृत सदस्यांच्या निवडीत भाजपने ज्याप्रमाणे समतोल राखला आहे, तसाच विचार सभापती निवडीतही केला जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी झालेल्या या सभेमुळे सोलापूरच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने गती आली असून, आगामी दोन-तीन दिवसांत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सभापती पदाचा उमेदवार निश्चित केला जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here