सोलापूर,दि.5: भाजपचे माजी सभागृह नेता श्रीनिवास करली यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोलापूर निलमनगर जवळील नरसिंहनगर येथील जमीन मालकी नसताना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भाजपाचे माजी सभागृह नेता श्रीनिवास अप्पाशा करली वय 47 वर्षे रा. निलमनगर सोलापूर यांचा जामीन अर्ज ज्युडिशिएल मँजेस्टिट वर्ग-1 (एस.वाय.सुळ) यांनी मंजूर केला.
श्रीनिवास करली यांना जामीन मंजूर
यात हकिकत अशी की, मजरेवाडी ता.उत्तर सोलापूर येथील निलमनगर जवळील शेतजमीन ही फिर्यादीचे वडील दिवंगत ॲड. शिवशंकर धर्मराव थोबडे यांची वडीलोपार्जित मालकीची होती व त्यांच्या मृत्यूनंतर 1996 साली झालेल्या वारसदार नोंदीमध्ये त्यांचे वारसदार म्हणून फिर्यादीचीआई विजया थोबडे, भाऊ ॲड. मिलिंद थोबडे व फिर्यादी सुप्रिया राजेंद्र नेर्ली, स्मिता सुरेश मागटी, वैशाली शिवलिंगेश बसवनाळ यांची नावे लागलेली होती. तदनंतर सन 2016 साली फिर्यादीची आई व भाऊ यांनी सदरची शेतजमीन ही तिन्ही बहिनींच्या नावे नोंदणीकृत हक्कसोडपत्राद्वारे लिहून दिलेली आहे.
सध्या स्मिता ही हैदराबाद येथे तर वैशाली ही बेंगलोर येथे राहण्यास असून अधून मधून सोलापूरला आले नंतर शेत जमिनीवर जाऊन पाहणी करत असते. सुनील बसप्पा बळी यांनी फिर्यादीचे हिश्यातील काही जमीन ही बनावट कुलमुखत्यार तयार करून काही लोकांना विकलेले असून त्याबाबतीत फिर्यादीने सदर बझार पोलीस ठाणे येथे त्यांचे विरोधात शेत जमिनीतील काही जागा विकली म्हणून तक्रार दिलेली आहे. तदनंतर फिर्यादी ही शेत जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर असे दिसून आले की सुनील बसप्पा बळी यांनी जी जागा विकलेली आहे, त्याचे शेजारी काही लोक हे थोडे पक्के बांधकाम तर थोडे पत्र्याचे बांधकाम करून शेत जमिनीवर राहण्यास असल्याचे निदर्शनास आले.
म्हणून फिर्यादीने चौकशी केली असता सदरची जागा ही आरोपी कडून विकत घेतलेली असल्याचे सांगितले. सदर शेत जमिनीमध्ये श्रीनिवास आशप्पा करली व मयत अशपा करली यांनी नरसिंह नगर म्हणून सदर जागेचा मी मालक असल्याचे दाखवून व खोटे भासवून 50 ते 60 लोकांना नोटरीने खरेदी करारनामा व कब्जा पावती देऊन खोटी कागदपत्रे तयार करून स्वतः सदर जागेचा मालक असल्याचे भासवून जागा विकलेली असून फिर्यादी व खरेदी घेणाऱ्या लोकांची फसवणूक केली आहे. अशा आशयाची फिर्याद सुप्रिया राजेंद्र नेली यांनी एम.आय.डि.सी. पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती व पोलिसांनी श्रीनिवास करली यास अटक केली होती.
आरोपी श्रीनिवास करली यांनी ॲड. संतोष न्हावकर यांच्यामाफत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
यात आरोपीतर्फे युक्तिवाद करताना अँड.संतोष न्हावकर यांनी सांगितले कि,1984 साली दिवंगत ॲड. शिवशंकर थोबडे यांनी सिलिंग कायद्याखाली जमीन सरकारजमा होण्याच्या भीतीने त्यांच्या 10 एकर जागेवर आशप्पा करली यांना झोपड्या टाकण्यास तोंडी सांगितले होते, आशप्पा करली 1997 साली मयत झाले, त्यांनतर श्रीनिवास करली यांनी काही लोकांना घर बांधण्यास जागा दिली, हा संपूर्ण प्रकार संमतीने झालेला असल्याने फसवणुकीचा हेतू नव्हता. अशा प्रकरणात बनावट दस्त तयार केला असे म्हणता येत नाही असे न्यायालयाचे निदर्शनास आणून त्यापृष्ठयर्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. तसेच वाटणीत अतिक्रमित जागा आल्याने चिडून फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केल्याचा युक्तिवाद केला. तो ग्राह्य मानून न्यायालयाने श्रीनिवास करली यांची जामिनावर मुक्तता केली.
यात आरोपीतफे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. वैष्णवी न्हावकर, ॲड. राहुल रूपनर, ॲड.शैलेश पोटफोडे ॲड. श्रेयांक मंकणी यांनी तर मूळफिर्यादीतफे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. मनोज व्हनमारे यांनी काम पाहिले.