“काही फोटो चांगलेही असतात आणि खरेही” आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेला फोटो शेअर करत दिले उत्तर

0

दि.२४: “कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी होते है” असे म्हणत मनसेने खासदार बृजभूषण सिंह यांचा शरद पवारांसोबतचा फोटो केला शेअर केला होता. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण सांगितले होते. आपल्या विरुद्ध महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. अशातच मनसेने फोटो शेअर केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही फोटो शेअर करत मनसेला उत्तर दिले आहे. राज्यातील मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये वेगळंच ‘फोटोवॉर’ पाहायला मिळू लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सचिव सचिन मोरे यांनी सकाळी फेसबुकवर बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवरून बराच राजकीय वाद सुरू झाला असून आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दुसरा एक फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे, सचिन मोरे यांनी हिंदीतून दिलेल्या फोटो कॅप्शनचं मराठी भाषांतर करून त्यांनी या फोटोला कॅप्शन दिली आहे. त्यामुळे या फोटोंवरून दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे.

मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकला हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

हेही वाचा “कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी होते है” मनसेने फोटो केला शेअर

हे फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावरून शरद पवारांनीच बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंच्या विरोधात रसद पुरवल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे खुद्द बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध करणं हे आपण पक्षाचंच काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एकीकडे हे राजकारण आणि दावे-प्रतिदावे रंगत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरींनी मनसेला दुसरा एक फोटो ट्वीट करून प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरींनी आपल्या ट्वीटमध्ये मनसेला खोचक टोला लगावणारा संदेश लिहिला आहे. यात सचिन मोरे यांच्या पोस्टमधील संदेशाचं मराठी भाषांतर देखील त्यांनी लिहिलं आहे. “आधारवड”. पवार साहेब! (काही फोटो चांगलेही असतात आणि खरेही! हिंदीत भाषांतर जाणीवपूर्वक टाळले आहे)”, असा संदेश ट्वीटसोबत मिटकरींनी लिहिला आहे.

अमोल मिटकरींचे ट्विट

अमोल मिटकरींनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिसत आहेत. या फोटोमध्ये राज ठाकरे शरद पवारांना हातात हात देत एका कार्यक्रमातल्या स्टेजवर चढण्यासाठी मदत करत असल्याचं दिसून येत आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मिटकरींनी ट्वीटमध्ये म्हटलेलं नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here