सोलापूर,दि.28: सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. घोटाळ्यात अडकलेल्या आणि जनतेची फसवणूक केलेल्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध करण्यासाठी भाजपाच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन सोलापूर भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्वीकारले. कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाकडे पोहोचवू असा शब्द दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांच्यासह माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे आदींचा बुधवार २९ ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची श्रीपूर येथील कार्यक्रमात राजन पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची पाटील, माने, आणि शिंदे बंधूंनी भेट घेऊन चर्चा केली होती. तेव्हाच या सर्वांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. त्यावेळी सोलापूर सिद्धेश्वर बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र त्यांचा प्रवेश बुधवारी न होता लांबणीवर गेल्याचे सांगितले जात आहे.








