सोलापूर,दि.१७ : काँग्रेसचे नेते माजी केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) तसेच आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेकदा सुरू असतात. यावर स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देशात सध्या अफवा पसरविण्याचे काम जोरात सुरू आहे माझ्याबद्दल आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या पक्षप्रवेशाबद्दलही विनाकारण चर्चा केली गेली. विरोधकांकडून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला पण माझ्या रक्तात काँग्रेस पक्ष भिनलेला आहे आणि भविष्यात याच पक्षाला चांगले दिवस येणार याचा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरोटी बुद्रुक येथे बोलताना केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे अलीकडच्या काळात मतदारसंघातील दौरे वाढू लागले आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवारी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी बुद्रुक येथे हुरडा पार्टीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, मल्लिकार्जुन पाटील, चेतन नरोटे, शितल म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, अशपाक बळोरगी, रईस टिनवाला, सिद्धार्थ गायकवाड, सातलिंग शटगार, महेश जानकर,राजू लकाबशेट्टी,पंडित मुळे, अशोक ढंगापुरे, पिंटू पाटील, बाबासाहेब पाटील, मल्लिनाथ कल्याण, आनंदराव सोनकांबळे, काशिनाथ कुंभार यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या काँग्रेस पक्षाचे दिवस वाईट आहेत…
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, काँग्रेस
पक्षाने मला न्यायालयातील चपराशीपासून ते देशाचे मोठे पद दिले ते मी कधीही विसरू शकत नाही. सध्या काँग्रेस पक्षाचे दिवस वाईट आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु हे दिवस लवकरच बदलणार असून पक्षासाठी चांगले दिवस येणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी झटण्याचे आवाहन त्यांनी केले.
मागील विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात मी प्रचार केल्याच्या अफवा झाल्या. त्यांचे वडील स्वर्गीय सातलिंगप्पा हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. याची मला जाणीव आहे. पुढे जाऊन सिद्धाराम म्हेत्रे हेदेखील मतदारसंघासाठी धडपडणारे नेते आहेत. अशा व्यक्तींच्या विरोधात मी कधीच प्रचार केला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
यावेळी बोलताना म्हेत्रे म्हणाले की,कुरनूर धरण व एकरूख उपसा सिंचन योजनेच्या पूर्णत्वासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व काँग्रेसच्या इतर मुख्यमंत्र्यांचे योगदान लाभले आहे. हे वास्तव असताना श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालू आहे. दुधनीच्या उड्डाणपुलासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे वारंवार पाठपुरावा देखील केला आहे. म्हणुन शंभर कोटी निधी मिळाला. त्या उड्डाणपुलाचे ही श्रेय भाजपा कडून घेतले जाते हे हास्यस्पद आहे,अशी
टीका माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली.