सोलापूर,दि.10: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे. सर्व जाती धर्मातील अनेकांनी काडादी यांना पाठिंबा दिला आहे. 2023 आठवा धर्मराज काडादी यांना विधानसभेत पाठवा! अशी साद श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याच्या कर्मचारी, सभासद व शेतकऱ्यांनी घातली आहे. 15 जून 2023 ला श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडण्यात आली होती. गेल्या पन्नास वर्षांपासून लाखो शेतकऱ्यांचे जीवन फुलविलेल्या आणि हजारो लोकांना रोजगार देऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू व सहकारातील आदर्श असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा घोट अखेर महापालिका प्रशासनाने घेतला होता.
मूठभर लोकांच्या विमानसेवेसाठी कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करून प्रशासनाने शेतकरी सभासद, कारखान्याचे कामगार, कर्मचारी, ऊस वाहतूक मजूर आणि छोटे व्यापारी यांच्या घरावर नांगर फिरविला. चिमणी पाडल्यामुळे अनेक नतद्रष्टांना आसुरी आनंद झाल्याचे दिसून आले होते.
शेतकरी कामगार हळहळले
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्थापन केलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यावर शेतकरी सभासदांचा मोठा विश्वास आहे. सहकार क्षेत्रातील अनेक कारखाने बंद पडलेले असताना मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सचोटी आणि पारदर्शी कारभार करून नेहमी शेतकऱ्यांचे हित पाहिले. साखर उद्योगातील स्पर्धेत त्यांनी नेहमीच ऊस उत्पादकांना जादा दर दिला. त्यामुळे सभासदांप्रमाणेच बिगर सभासदांनाही ‘सिध्देश्वर’ हा आपला कारखाना वाटतो. सहकार चळवळीतील हा आदर्श कारखाना टिकावा आणि वाढावा यासाठी पाठबळ देण्याऐवजी सरकारने कारखान्याची चिमणी पाडून गरीब व छोट्या शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त केले. त्यामुळे चिमणी पाडल्याचे दुःख अनेक शेतकऱ्यांना सहन झाले नाही.
‘सिध्देश्वर’ची चिमणी पाडल्यानंतर सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. या कारखान्यावर हजारो कुटुंबीयांची उपजीविका होती. अशा आदर्शवत कारखान्याची चिमणी पाडल्याबद्दल सोशल मीडियातून शहर व जिल्ह्यातील विशेष करून तरुणांनी तीव्र ‘भावना व्यक्त केल्या होत्या. ‘तुमच्या उन्मत सत्तेचा बुरुज बळीराजा असाच जमीनदोस्त करेल’ आजचा दिवस सोलापूरच्या इतिहासातला काळा दिवस असून, दळभद्री मानसिकतेचा जाहीर निषेध, आज फक्त चिमणी पडली नाही तर इथला कामगार देशोधडीला लागला आहे.
त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम प्रशासनाकडून झाले आहे. फक्त सोलापूरकरांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या असुरी आणि घातकी कृत्याकडे लागून राहिले आहे. जे कोणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष या कृत्यामध्ये सहभागी आहेत त्यांना त्यांची फळे लवकरच मिळतील. एखादी संस्था उभारण्यात, तिला नावारूपास आणण्यास काय कष्ट करावे लागतात हे माहीत असते तर आजचे हे कृत्य कोणीही केले नसते.
आता 2024 मध्ये ‘तुमच्या उन्मत सत्तेचा बुरुज बळीराजा असाच जमीनदोस्त करेल’ ही 2023 मध्ये तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना सत्यात उतरत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्मराज काडादी यांच्यामागे लिंगायत, धनगर, मराठा तसेच मुस्लीम समाजातील अनेकांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष उमेदवार काडादी यांना पाठिंबा देण्यासाठी अनेकजण एकत्र येत आहेत.