सोलापूर,दि.२०: सोलापूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा आज होणार आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. १०२ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार गट) नगरसेवक वैभव हत्तुरे हेही सत्ताधारी गटात सामील झाले आहेत. आज होणाऱ्या सभेत दहा स्वीकृत सदस्यासह स्थायी समितीचे १६ आणि परिवहन समितीच्या १२ सदस्यांची निवड होणार आहे.
महापालिका सभागृहात जाण्याची संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिली सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता सुरु होईल. या सभेत आधी दहा स्वीकृत सदस्य निवडण्यात येतील. यासाठी ६२ जणांनी आयुक्तांडे अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष रोहिणी तडवळकर, जगदीश पाटील, प्रभाकर जामगुंडे, पांडुरंग दिड्डी, सुधा अळ्ळीमोरे, वृषाली चालुक्य यांच्यासह इतरांचा समावेश आहे. माजी नगरसेवक जगदीश पाटील हे अभ्यासू व कार्यक्षम म्हणून ओळखले जातात.
१०२ सदस्य असलेल्या महापालिकेत भाजपचे ८७ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी त्यांनी युती केल्यामुळे ही संख्या ८८ वर पोहोचली आहे. त्यामुळे एकुण दहा स्वीकृत सदस्यापैकी नऊ सदस्य युतीचे असतील. आठ सदस्य असलेल्या एमआयएम पक्षाला एक जागा मिळणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नसल्याने त्यांना स्वीकृतची संधी मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र स्थायी तसेच परिवहन समितीवर जाण्याची संधी त्यांना मिळेल.
महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासून स्वीकृत सदस्याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपाकडून २० जणांना अर्ज भरण्यास सांगीतले होते. परंतु त्यापेक्षा अधिक जणांनी अखेरच्या क्षणी आपला विचार होईल या आशेने अर्ज भरला आहे. गुरुवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी अकरा ते दीड ही मुदत देण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे पेक्षा जास्त इच्छुक असल्याने उमेदवार निवडण्याचे अधिकार प्रदेशवर सोपवण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला. अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी गुरुवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली होती.








