सोलापूर,दि.3: सोलापूर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांनी 22 डिसेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झाली होती. आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे शिवसेनेवर (Shivsena) नाराज असल्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तानाजी सावंत यांच्या कात्रजच्या (पुणे) घरी भाजप नेते खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले पोहोचले आहेत. त्या दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
मागील भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये तानाजी सावंत हे पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री होते. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल असा दावा केला जात होता. त्यासाठी त्यांनी सोलापूर आणि उस्मानाबादच्या सेना पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून लॉबिंग करायचा प्रयत्न केला. नेमकी हीच गोष्ट मातोश्रीतल्या नेत्यांना आवडली नाही. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. तेव्हापासून सावंत पक्षावर नाराज आहेत. मध्यंतरी त्यांनी उस्मानाबाद भाजपशी संधान बांधून स्थानिक राजकारणात सत्तांतराचा खेळ खेळला. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. त्यातच आता त्यांच्या पुण्यातील कात्रजच्या घरी संभाजीराजे भोसले आले. त्या दोघांत दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे पुन्हा एकदा तानाजी सावंत हे कुठं जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.