सोलापूर,दि.३०: सोलापूरमध्ये शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसने भारतीय जनता पार्टीवर वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. दुपारी 3 पर्यंतच वेळ होती. पक्षाच्या उमेदवारांना दुपारी 3 पर्यंतच एबी फॉर्म दाखल करता येणार होता.
भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी दुपारी तीन वाजण्याच्या अगोदर एबी फॉर्म घेऊन महापालिका निवडणूक कार्यालयात पोहोचले. शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपा उमेदवारांना वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप केला.
वेळ संपल्यानंतर भाजपा उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख अजय दासरी, शिंदे सेना गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ठिय्या आंदोलन केले. निवडणूक कार्यालयाच्या दारात घोषणा देत आंदोलन केले.








