सोलापूर समर्थ बँक प्रकरण सोमवारपासून…

0

सोलापूर,दि.29: सोलापूर समर्थ बँक प्रकरण विमापात्र ठेवीदारांच्या अर्जाची सोमवारपासून तपासणी होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर (Samarth Sahakari Bank Ltd. Solapur) अॅाक्टोबर महिन्यात निर्बंध घातले होते. समर्थ सहकारी बँक ही नावाजलेली बँक आहे. बँकिंग नियमन अधिनियम 1949च्या कलम 35(अ) आणि 56 नुसार पुढील सहा महिन्यासाठी बँकेच्या व्यवहारवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधामुळे बँक परवानगीशिवाय नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा कोणतीही मालमत्ता विक्री अथवा हस्तांतर करू शकणार नाही. 

आर्थिक निर्बंधांमुळे अडचणीत सापडलेल्या समर्थ सहकारी बँकेच्या विमापात्र ठेवीदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाची सोमवार, 1 डिसेंबरपासून तपासणी होणार आहे. त्यानंतर 1 जानेवारीपासून ठेवीदारांच्या रकमा त्यांच्या अन्य बँकेच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

ठेव विमा महामंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठेवीदारांनी दाखल केलेले अर्ज तपासल्यानंतर पात्र ठेवीदारांची सूची अंतिम केली जाणार आहे. दाखल अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर ठेवी परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. बँकेवर आर्थिक निर्बंध लागू झाल्यानंतर अनेकांचे व्यवहार ठप्प झाले होते. त्यामध्ये सर्वसामान्य ठेवीदारांच्या अडकलेल्या रकमांचा प्रश्न गंभीर होता.

सध्या बँकेवर लादलेले आर्थिक निर्बंध हटवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठविला असून निर्बंध हटविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी सांगितले. निर्बंध हटल्यास बँकेचे व्यवहार पूर्ववत सुरू होण्याची शक्यता असून, त्याचा थेट फायदा ठेवीदारांना मिळेल. जानेवारीपासून पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यास हजारो ठेवीदारांची आर्थिक कोंडी दूर होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here