सोलापूर,दि.२८: Solapur Rain News: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मुसळधार पाऊस पडला आहे. बंगालमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी दिवसभर सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
दिवसभर कधी हलका तर कधी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे होटगी येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाणी पुलावरुन वाहत आहे. त्याचप्रमाणे जुना पुणे नाका येथील नाल्याचेही पाणी वाढल्यामुळे सायंकाळी वसंत विहारजवळील नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नाल्याचे पाणी आर्यनंदी नगरात शिरले.

सध्या सोलापुरात एनडीआरएफ व लष्कराच्या हेलिकॉप्टर द्वारे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बचाव करण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत १२९ गावातील ४ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. शनिवारी सकाळपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे,
सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना शनिवार व रविवार हे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच शहर व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभर काही वेळ मुसळधार तर काही वेळ संततधार पाऊस बरसल्याने सायंकाळी सातच्या सुमारास जुना पुणे नाका येथील नाल्याचे पाणी वाढले. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने वसंत विहार येथे धाव घेतली.
परिसरात पाहणी करुन येथील वसंत विहार ते गणेश नगरपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पाण्याची पातळी वाढल्याने हे पाणी आर्यनंदी नगरातील रस्त्यांवर आले होते. गेल्या २४ तासात सोलापुरात ४५.४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
होटगी रस्ता दोन तास बंद | Solapur Rain News
सोलापूर शहर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून पाणी ओव्हर फ्लो झाले आहे. हे पाणी सोलापूर होटगी रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने शनिवारी सकाळी सुमारे दीड ते दोन तास वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर पाण्याचा फ्लो कमी झाल्यामुळे मोठी वाहतूक सुरु करण्यात आली.
तुळजापूर नाका पुलावर पाणी
शहर व परिसरात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर जुना तुळजापूर नाक्याजवळील पुलावर शनिवारी सायंकाळी ओढ्याचे पाणी आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होती.








