सोलापूर,दि.2: Solapur-Pune Road Accident: सोलापूरहून पुण्याकडे भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने ओव्हरटेक करताना ट्रकला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) यवत येथे बुधवारी पहाटे सव्वापाच वाजता घडला. मृतांमधील तिघे अक्कलकोट तालुक्यातील आहेत. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. (Solapur Accident)
सोलापूर-पुणे महामार्ग अपघात | Solapur-Pune Road Accident
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरहून एक खासगी प्रवासी बस पुण्याकडे येत होती. सर्व प्रवासी झोपेत असताना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील सीएनजी पंपाजवळ टायर फुटल्याने एक ट्रक रस्त्यात थांबलेला होता. बसचालकाला हा ट्रक उशीरा दिसला त्याला चुकवून पुढे जाताना चालकाचा अंदाज चुकला व बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे. या अपघातात चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
अपघातात चौघांचा मृत्यू | Solapur Accident
पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय 36), अमर महांतेश कलशेट्टी (वय 26, रा. गोगाव), गणपत मलप्पा पाटील (वय 55, रा. सलगर), आरती अंबण्णा बिराजदार (वय 22, रा. चपळगाव) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. तर अक्षय चव्हाण, नागेश शंकर बिरनोर, राजू अंजनगावकर, अभिषेक बिराजदार, तुषार वाघमारे, पोलीस कर्मचारी बसवराज गणप्पा गजा, त्यांची पत्नी सोनाली गजा यांच्यासह 17 जण जखमी झाले आहेत.
या अपघातात चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांमधील आरती बिराजदार ही पुणे येथे इंजिनियर म्हणून खासगी कंपनीत नोकरीला होती. गरीब कुटुंबात जन्मलेल्या आरतीने मोठ्या जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिली होती. तिच्या निधनाचे वृत्त समजताच चपळगाव येथे शोककळा पसरली.
पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे हे पुण्यातील भरोसा सेलमध्ये कार्यरत होते. तर, बसवराज गजा हे लष्कर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. नितीन शिंदे हे पुण्याहून सोलापूर येथे बदली झालेल्या एका पोलीस निरीक्षकास पुण्याहून सोलापूर येथे सोडण्यासाठी गेले होते. परत येताना त्यांचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.