सोलापूर,दि.२९: सोलापूर येथील नई जिंदगी चौकामध्ये भर दिवसा खून करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मुश्ताक नासिर पटेल (वय ३६, रा. सिद्धेश्वर नगर भाग चार) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
या खटल्याची हकीकत नाव आहे. या खटल्याची हकीकत अशी की, १२ जून २०२० रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास नई जिंदगी चौकामधील अमन चौक ते मजरेवाडी रस्त्यावर आरोपी मुश्ताक पटेल याने मागील भांडणावरून शकील पटेल याच्यावर चाकूने छातीवर, पोटावर, हातावर आणि पाठीवर वार करून खून केला. गुन्ह्यात वापरलेला चाकू रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीजवळ टाकून तो पळून गेला.
याप्रकरणी मयत शकील पटेल यांचा भाऊ अलीमोद्दीन पटेल याने आरोपी विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणातील आरोपी हा स्वतः हून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी या घटनेची तपास करून न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्यावतीने बचावासाठी एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मुश्ताक पटेल यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अॅड. यू.डी. जहागीरदार यांनी काम पाहिले.








