सोलापूर,दि.१५: सोलापूरकरांची मागणी पूर्ण होणार आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेचे उद्घाटन आज ( बुधवारी) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, स्टार एअर ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांची उपस्थिती राहणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बदल
मुख्यमंत्री फडणवीस हे ‘स्टार एअर’च्या विमानातून पहिले प्रवाशी म्हणून मुंबईहून सोलापूरला येणार होते. मात्र, त्यांच्या या दौऱ्यात बदल करण्यात आला असून ते आता नागपूरहून सोलापूरला येणार आहेत. विमान सेवेच्या उद्घाटनानंतर पाच प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात येणार आहेत.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरातील पूरग्रस्तांना दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांकडून हवेत फुगे सोडले जाणार असून ‘स्टार एअर’कडून सोलापूर विमानतळावर वॉटर सॅल्यूट दिले जाणार आहे.
सोलापूर विमानतळावर चार हजार नागरिक बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.काही मान्यवरांना व्हीव्हीआयपी पासेस देण्यात आले असून, सर्वसामान्यांनाही कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार असून या स्वप्नपूर्ती सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आहे.








