सोलापूर,दि.२०: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. भाजपचे ८७ उमेदवार निवडून आले आहेत. निकालानंतर प्रतिक्षा असलेल्या महापौर पदाचे आरक्षण येत्या गुरुवारी जाहीर होणार असून त्यादिवशी सोलापूरच्या ३८ व्या महापौरासाठीची स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. महापौर पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत.
सोलापूरसह राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी २२ जानेवारी रोजी आरक्षण काढण्यात येईल असे शासनाच्या नगरविकास विभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. महापौर पदासाठी अनेक नावांची चर्चा असली तरी आरक्षण कोणते पडणार यावरच उमेदवार ठरवला जाईल.
विनायक कोंड्याल, डॅा. किरण देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत तर किरण देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव आहेत. कोंड्याल हे चारवेळा वेगवेगळ्या पक्षाकडून निवडून आले आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन महापौर पदाचे उमेदवार म्हणून त्यांना पसंती मिळू शकते अशी चर्चा आहे. तर किरण देशमुख हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळच्या निवडणुकीत पुढाकार घेऊन सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले. काही प्रभागात अन्य पक्षातील मातब्बर माजी नगरसेवकांना उमेदवारी देऊन निवडून आणले. यामुळे भाजपाचे संख्याबळ वाढले आहे. महापौर पदाचा उमेदवार निवडताना कोठे यांची शिफारस पक्षाला विचारात घ्यावी लागणार आहे.
प्रथमेश कोठे, नरेंद्र काळे तसेच रंजिता चाकोते यांचीही नावे चर्चेत आहेत. प्रथमेश कोठे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. माजी महापौर स्व. महेश कोठे यांचे ते चिरंजीव आहेत. गेल्यावेळी शिवसेनेच्या तिकीटावर तर यावेळी भाजपाच्या तिकीटावर ते निवडून आले आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांना भाजपात आणले आहे. त्यांचे नाव महापौर पदासाठी चर्चेत असले तरी त्यांनी नकार दिला आहे. रंजित चाकोते काँग्रेस पक्षातून भाजपात आल्या आहेत.








