सोलापूर,दि.२०: सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूरहून मुंबई मार्गे इंदोरसाठी विमानसेवा सुरू होणार असून, बुधवार, २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता इंदोरसाठी पहिले विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोमवारी, सायंकाळी हॉटेल बालाजी सरोवर येथे करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी ही माहिती दिली.
सोलापूर–मुंबई हे विमान मुंबईत सुमारे अर्धा तास थांबून पुढे इंदोरकडे रवाना होणार आहे. संबंधित विमान सायंकाळी ६ वाजता इंदोर विमानतळावर दाखल होणार असल्याने सोलापूर ते इंदोर हा प्रवास सुमारे तीन तासांचा असेल.
स्टार एअर कंपनीकडून ही विमानसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. इंदोरसाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाली असून सुरुवातीचे तिकीट दर ४ हजार ९०० रुपये आहेत. बुकिंगनुसार तिकीट दरात वाढ होऊ शकते, असे सांगण्यात आले.
सोलापूरहून मुंबईसाठी स्टार एअरची विमानसेवा दररोज दुपारी ३ वाजता सुरू असून संबंधित विमान सायंकाळी ४ ते ४.१५ दरम्यान मुंबईत लँड होईल. तेथे अर्धा ते पावण तास विश्रांतीनंतर हेच विमान इंदोरकडे उड्डाण घेणार आहे. इंदोर हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून राजस्थानच्या सीमेवर असल्याने या विमानसेवेला सोलापुरातून चांगला प्रतिसाद मिळेल.








