सोलापूर,दि.२६: Solapur Heavy Rain News Today: सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असतानाच हवामान खात्याने पुन्हा सोलापूर, धाराशिव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात २७ व २८ सप्टेबर रोजी रेड अलर्टचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले आहे. (Solapur Rain Update)
Solapur Heavy Rain News Today
शुक्रवारी, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती उद्भवली आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, सोलापूरमधील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी सांगितले.
अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. माढा, करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सीना नदीच्या पूरात बचावकार्यासाठी दोन एनडीआरएफचच्या टीम सीना नदीकाठ परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय सैन्य दलाकडून मागविण्यात आलेले हेलीकॉफ्टरही थांबविण्यात आले आहेत. शनिवारी पावसाचा अंदाज पाहून सैन्य दलास आणखी किती वेळ ठेवायचे याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.








