सोलापूर,दि.17: Solapur-Goa flight | सोलापूर-गोवा विमानसेवा फ्लाय 91 (FLY91) कंपनी मोठा निर्णय घेणार आहे. सोलापूर-गोवा विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे ही सेवा दररोज ठेवण्यासाठी फ्लाय 91 कंपनीकडून तयारी सुरू आहे. सोलापूर – तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 कंपनी इच्छुक आहे.
तसे पत्रव्यवहार त्यांच्याकडून सुरू असून महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण तसेच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक महासंचनालयाकडून मान्यता मिळताच ही विमानसेवा सुर होण्याची शक्यता आहे.

तिरुपतीसाठी विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने फ्लाय ९१ कंपनीने आराखडा तयार केला आहे. तिरुपती विमानतळावर स्लॉटसाठी प्रयत्न सुरू आहेत. तिरुपती नंतर बंगळूरसाठीही फ्लाय ९१ कंपनी तयारी करणार आहे.
त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यासाठी १५ ऑगस्ट पासून सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी वाहतूक महासंचनालयाने अर्थात डीजीसीएने मान्यता दिली आहे. स्टार एयर कंपनीकडून तसे प्रयत्न सुरू आहेत.
स्टार एअरचे मार्केटिंग ऑफिसर सेंथिल राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई तसेच पुण्यासाठी मान्यता मिळाली असून आता महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणालाही स्लॉटसाठी पत्र पाठवले आहे. स्लॉटला मान्यता मिळताच आम्ही मुंबईसाठी विमानसेवा सुरू करू. साधारण ऑगस्टमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तसे आमच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.