Solapur: राष्ट्रवादीच्या उमेदवाराने केला भाजपात प्रवेश 

0

सोलापूर,दि.13: सोलापुरात (Solapur) भाजपाने राष्ट्रवादीला (अजित पवार गट) मोठा धक्का दिला आहे. महापालिके करिता 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र सोलापुरातील प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) भाजपात प्रवेश करत भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. एवढ्या वरच न थांबता त्या उमेदवाराने भाजपाला मतदान करावे असे आवाहन करत डोअर टू डोअर प्रचार सुरू केला आहे. 

महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपने  मोठी खेळी खेळली आहे. शहरातील प्रभाग  9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 9 ड मधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत होती. मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या गोटात घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मतदानापूर्वीच घडलेल्या या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकारणात आणखी नाट्यमय वळण लागले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here