सोलापूर,दि.18: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील फटे घोटाळ्याची (Fate Scam) गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरु होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे (Vishal Fate) हा काही दिवस फरार देखील होता. दरम्यान युट्युबवर अचानक विशाल फटे यांनी आपण स्वतःहून पोलिसांना शरण जाणार असल्याचे म्हटले होते. तसेच आपण कोणाचीही फसवणूक केली नसल्याचे सांगितले होते. दरम्यान सोमवारी स्वत:हून पोलिसांत हजर झाल्यानंतर फटे याला आज बार्शी न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयात दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर फटे याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आरोपी विशाल फटे याने स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली आणि रात्री तो पोलिसांत हजर देखील झाला. ज्यानंतर मंगळवारी त्याला बार्शी न्यायालयात हजर केले गेले. यावेळी फटेच्या वकिलांनी (ॲड. विशाल बाबर) हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. पण याला विरोध करत सरकरी वकिल प्रदीप बोचरे यांनी पोलिसांची बाजू मांडली. ज्यानंतर अखेर न्यायालयाने फटे याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आरोपी विशाल फटे याचे वकील विशाल बाबर यांनी त्याची बाजू मांडली. ‘आरोपी तपासाला सहकार्य करणारा आहे, त्यामुळे तो स्वतःहून हजर झाला आहे. त्याने लोकांना फसवलेले नाही. फसवणूक झालेल्यांचा जो आकडा सध्या सांगितला जात आहे तो फुगवलेला आकडा आहे. तक्रार करणाऱ्यांनी तक्रारीमध्ये आरोपीचा फोन लागत नाही, तो सापडला नाही अशी तक्रार केली आहे. एकानेही दिलेल्या मुदतीत पैसे परत दिले नाही अशी फिर्याद दिलेली नाही. तसंच आरोपी हा न्यायप्रिय आहे त्यामुळे तो तपासला सहकार्य करेल, म्हणून पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद बाबर यांनी केला. पण याला प्रत्युत्तर देत सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी आरोपी विशाल फटेचे सर्व गुन्हे यावेळी सांगितले. ‘त्याने लोकांना मोठ्या परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने लोकांना परतावा देखील दिला, मात्र जेव्हा अशक्य झाले तेव्हा इथून पळून गेला. सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपीने 3 विविध कंपन्या सुरू केलेल्या होत्या, आणखी काही फसवणूक त्याने केली आहे का? याचाही तपास सुरु आहे.
दरम्यान त्याने पैशांचे नेमके काय केले? याचा शोध होण्यासाठी पोलीस कस्टडीची गरज आहे. प्रदीप यांच्या या युक्तिवादानंतर त्यांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.
आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून तो मागील काही दिवासांपासून फरार होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींची फसवणूक केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 75 हून अधिकजणांची विशालने 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.