सोलापूर,दि.२१: बाशीं शहर व तालुक्यातील अनेक (Fate Scam) गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे (Vishal Fate) ( वय ३५ ) याची ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरु असून गुरुवारपर्यंत गुंतवणूकदारांच्या आकडा २० कोटी १५ लाखांवर पोहोचला आहे.
फसवणुकीचा मोठ्या प्रमाणात परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल फटेसह पाचजणांविरुध्द शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुंतवणूकदार दीपक बाबासाहेब अंबारे ( वय ३७, रा. बार्शी ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विशाल फटेसह राधिका विशाल फटे, अंबादास गणपती फटे, वैभव अंवादास फटे, अलका अंबादास फटे ( सर्व रा. अलिपूर रोड, माऊली चौक ) यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
फटे हा सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला होता. त्याला मंगळवारी बार्शी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संजय बोठे म्हणाले, सुरुवातीला साडेपाच कोटींच्या फसवणुकीचा असलेला आकडा आता २० कोटी १५ लाखांवर पोहोचला आहे. गुरुवारी नव्याने आठ तक्रारदारांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदविल्या आहेत. त्यातून सुमारे ६० लाख १५ हजारांच्या फसवणुकीचा आकडा वाढला आहे. फटे याच्याकडे असलेला लॅपटॉप व मोवाइलवरुन तांत्रिक वावींचा तपास सुरु असल्याचे वोठे यांनी सांगितले.