Solapur Crime: शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक प्रकरण विशाल फटे सोलापूर पोलिसात हजर

0

सोलापूर,दि.१७: Solapur Crime: शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक प्रकरणातील विशाल फटे (Vishal Fate) स्वतः सोलापूर पोलिसात हजर झाला आहे. बार्शीतील फसवणुकी प्रकरणातील मुख्य सूत्रधार विशाल फटे याचा शोध राज्यभरात पोलिस करीत होते. मात्र फटे सोमवारी दुपारी अचानकच युट्यूब द्वारे लाईव्ह आला आणि एकच खळबळ उडाली. अर्ध्या तासाच्या व्हिडीओमध्ये अनेक गोष्टी फटेने सांगितल्या. पोलिसांनी शोध घेण्याची गरज नसून आपण स्वत: पोलिस ठाण्यात हजर होणार असल्याचे तो म्हणाला. २०० कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आला, मात्र ही २०० कोटी रुपयांचा आकडा आला कसा, कोणी आणला ? असा प्रश्न करीत प्रत्यक्ष १० ते १२ कोटी रुपयेच मी देणे बाकी आहे, असेही फटे म्हणाला.

आज (दि.१७) संध्याकाळी विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मुख्यालयात हजर झाला आहे. विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिसांत हजर झाला असून पोलीस अधीक्षक यांच्यासमोर आपली बाजू मांडत आहे.पोलिसांकडूनही त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार, विशालने पत्नी आणि त्याच्या मुलीला नातेवाईकांकडे ठेवले आहे.

अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येईल. उद्या मंगळवारी बार्शी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पत्नीला अटक करण्याची गरज नसल्याचं पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी म्हटलंय. 

या अर्ध्या तासांत अनेक गोष्टींकडे फटेने लक्ष वेधले असले तरी फोन बंद ठेऊन अचानक गायब होणे ही बाब गुंतवणुकदारांना व बार्शीकरांच्याही पचणी पडलेली नाही. सोमवारी बालताना तो म्हणाला, दोन कोटी माझ्या बँक खात्यावर असताना ही रक्कम सोडून मी पळून जाईल कसा ? मलाही कोणी तरी फसवले आहे. ज्याने फिर्याद दिली ते दीपक अंबारे याला आपण कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत, अंबारेही मला देणे लागतो. २०० कोटी रुपयांना फसवले असे बोलले जात असले तरी हा आकडा प्रत्यक्षात १० ते १२ कोटी रुपयांच्या पुढे नाही. इतका मोठा आकडा असता तर मी सहजपणे बाहेर देशांत कुटुंबासह स्थायिक झालो असतो. कोणताही कमिशन एजंट मी नियुक्त केला नव्हता. मी जे काही केले त्याची शिक्षा भोगायला तयार आहे.

आई, वडिल व कुटुंबाचा याच्याशी कसलाही संबध नाही. फिर्यादी झालेले दीपक अंबारे, विश्वास वीर, अक्षय वीर यांनी माझ्याकडून लाखो रुपये कमावले आहेत, ते यावर काहीच बोलले नाहीत, शिवाय मी ट्रेंडींग करत नव्हतो ही चुकीची चर्चा आहे. गुंतवणुकदारांशी केलेल्या करारपत्रात वा धनादेशावर २८ टक्के परतावा असे मी कुठेही म्हटलेले नाही. तरीही माझ्यापरीने अनेकांना मोठी रक्कम माझ्यामुळे कमवता आली आहे. अनेकांना व्यवसाय उभा करून दिले, मदत केली आहे. मी अडचणीत आलो असलो तरी गुंतवणुकदारांचा नया पैसाही मी बुडवणार नाही, भिक मागेन पण रक्कम परत करेन, असे फटे म्हणाला.

विशाल फटे याने लाईव्ह करून सांगितलेल्या गोष्टींमुळे आता फिर्यादी असलेले दीपक अंबारे यांच्याकडे अनेकजण पाहू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबारेही रडले आणि सोमवारी फटेनेही डोळ्यातून पाणी काढले. या दोघांपैकी खरे अश्रू कोणाचे ? हा नवा प्रश्न बार्शीकरांसह गुंतवणुकदारांसमोर उभा राहिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here