Solapur Crime: आईसह दोन मुलींचा मृत्यू पतीसह तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

0

सोलापूर,दि.२३: Solapur Crime: उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे आई व दोन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला वेगळे वळण लागले असून तिचा छळ केल्याने तिने आपल्या दोन मुलींसह जीवनयात्रा संपविली आहे. पतीसह दहाजणांवर हुंडाबळीचा गुन्हा सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी सारिका अक्षय ढेकळे ( वय २२ ) व तिच्या दोन मुली गौरी अक्षय ढेकळे ( वय ५ ) व आरोही अक्षय ढेकळे ( वय २, सर्व रा. पाथरी ) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता.

याबाबत विवाहिता सारिका हिची आई लक्ष्मीबाई व्यंकट सुरवसे ( वय ४०, रा. नंदगाव, ता. तुळजापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलीचा पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे ( वय २२ ), सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे ( वय ५४ ), दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे ( वय २५ ), सासू अनिता उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे ( सर्व मूळगाव बेलाटी, सध्या रा. पाथरी, ता. उ. सोलापूर ), विलास सुरवसे, सोजरवाई विलास सुरवसे ( दोघे रा. नंदगाव ), साळुबाई बाळा गुंड, बाळा गुंड, छकुली ( सर्व रा. पाथरी ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पती आकाश, सासरे उत्तम ढेकळे व दीर अण्णासाहेब ढेकळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

तिघींच्या मृत्यूच्या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी सारिका हिला लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांचा मानपान केला नाही, चांगला आहेर केला नाही, सोने दिले नाही म्हणून टोचून बोलून अपमान करणे, तिला नवीन कपडे जाणून बुजून न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, फोनवर बोलू न देणे आणि दोन्ही मुली झाल्या म्हणून टोचून बोलणे, मारहाण करणे, शारीरिक व मानसिक छळ करुन क्रूरपणाची वागणूक दिली, मानापमानाच्या मागणीला कंटाळून सारिका हिने गौरी व आरोही या दोन मुलींसह घरालगत असलेल्या शेततळ्यात जीव दिला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अधिक तपास फौजदार दीपक दळवी हे करीत आहेत. ही बाब उजेडात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघांना अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मिसाळ आर. ए. यांच्या न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यात सरकारतर्फे ॲड. बनसोडे तर आरोपींतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here