सोलापूर, दि.१५: प्लॉटचा खोटा सातबारा उतारा वापरून शासनाची फसवणूक केल्याबद्दल माजी महापौरांसह तत्कालीन तलाठी व मंडल अधिकाऱ्यांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत चंद्रकांत हेडगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुखदेव भीमा राठोड, माजी महापौर विठ्ठल करबसू जाधव आणि तत्कालीन तलाठी व मंडलाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी सातबारा उतारा खोटा आहे हे माहीत असताना देखील तो खरा आहे म्हणून वापरून जुना सर्वे नंबर ३६२ / अ, १ / १ व त्याचा नवीन सर्वे नंबर ६२२ / अ, १ / २ / व टीपी नंबर ४ प्लॉट नंबर १०२ ते १०५ याची खरेदी करून सातबारा उताऱ्यावर नाव लावून घेतले आहे. त्याचप्रमाणे प्लॉट नंबर १२१ ते १२८ प्रकरणी सिद्धप्पा हनुमंतप्पा गट्टे, विठ्ठल जाधव व तत्कालीन तलाठी व मंडल अधिकाऱ्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
प्लॉट नंबर १० ९ ते ११३ प्रकरणी भिमराज कुळाजी परमार, सोमनाथ विठ्ठल जाधव, विठ्ठल जाधव व तत्कालीन तलाठी व मंडल अधिकाऱ्यावर तिसरा गुन्हा नोंद झाला. तर विठ्ठल जाधव, परशुराम मरगु जाधव, तत्कालीन तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर प्लॉट नंबर ८१ ते ८५ प्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे.