महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता, कोण होणार स्वीकृत सदस्य आता

0
गुरुशांत धुत्तरगावकर आणि रोहिणी तडवळकर

सोलापूर,दि.१८: सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आली आहे. १०२ जागांपैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या आहेत. शिवसेनेला (ठाकरे गट) एकही जागा मिळाली नाही. राष्ट्रवादीलाही (शरद पवार गट) एकही जागा जिंकता आली नाही. भाजपने मात्र ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. सोलापूर महानगरपालिकेत १० स्वीकृत सदस्य नियुक्त होतील. 

भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपचे ९ जण स्वीकृत सदस्य होऊ शकतात. भाजपच्या यशासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर (Gurushant Dhuttargaonkar), भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर (Rohini Tadwalkar), प्रभाकर जामगुंडे, पद्माकर काळे यांच्यासह काहींची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागू शकते. 

भाजपाच्या यशासाठी धुत्तरगावकर, तडवळकर यांच्यासह अनेकांनी सुरूवातीपासून परिश्रम घेतले आहेत. गुरूशांत धुत्तरगावकर हे आमदार देवेंद्र कोठे यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवाय त्यांनी यापूर्वी नगरसेवक असताना त्यांच्या  काम करण्याच्या पद्धतीमुळे ते चर्चेत आले होते. आदर्श नगरसेवक कसा असावा याचे उदाहरण म्हणून धुत्तरगावकर यांना ओळखले जात होते. 

मागच्या सभागृहात पाच सदस्य होते. महापालिका अधिनियमात सुधारणा झाली असल्याने हि संख्या दुप्पट झाली आहे. १०२ सदस्य असलेल्या सभागृहात दहा स्वीकृत सदस्य म्हणजे दहा सदस्यामागे एक स्वीकृत सदस्य असे प्रमाण राहील. ज्या पक्षाचे किमान दहा नगरसेवक निवडून आले आहेत त्या पक्षाला एक स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here