भीषण अपघातात पोलिसासह सख्खे भाऊ ठार, देवदर्शन करुन परतताना घडली दुर्घटना

0

सोलापूर,दि.५: पंढरपूरहून देवदर्शन करून सोलापूरकडे (Solapur Accident) निघालेली ओमनी कार धोकादायक स्थितीत पंढरपूर – मोहोळ रस्त्यावर सारोळे पाटीनजीक उभ्या असलेल्या एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातामध्ये दोन भाऊ जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून ड्यूटीवर असणारे दयानंद अण्णाराव बेल्लाळे ( वय ३० ) हे आपल्या परिवारासह ओमनी कार ( एमएच १२, एनइ ४४८७ ) मधून पंढरपूर येथे देवदर्शनाला गेले होते.

देवदर्शन आटोपून सोलापूरकडे येत असताना सारोळे पाटीनजीक धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभ्या असलेला ट्रक ( एमएच १२, एफझेड ७३७७ ) वर पाठीमागून जोरदार आदळली. या अपघातात दयानंद अण्णाराव बेलाळे (वय ३०) आणि सचिन अण्णाराव बेलाळे (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघे रा. रोखडा-सावरगाव ता. अहमदपूर जिल्हा लातूर येथील मूळ रहिवाशी असून या अपघातात सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी दयानंद बेल्लाळे यांचा समावेश आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये पाठवून दिले. याबाबत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत. अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here