सोलापूर,दि.१२: सोलापूर महानगरपालिकेने शाळेच्या अवैध बांधकामावर कारवाई केली आहे. मजरेवाडी येथील आपना नगर येथे असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलचे अतिक्रमित दोन वर्ग, एक पत्रा शेड रूम आणि शाळेचे कार्यालय अखेर आज जेसीबीने पाडकामाची कारवाई सोलापूर महापालिकेकडून करण्यात आली.
पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने महानगरपालिकेच्या बांधकाम, नगररचना व अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. या बांधकामानंतर अखेर तो रस्ता अतिक्रमणमुक्त झाला.
मजरेवाडी येथील आपना नगर परिसरात नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या शाळेने मूळ बांधकाम आराखड्याच्या बाहेर जाऊन सुमारे २२ फूट रस्त्यावर दहा फूट अतिक्रमण केले होते. त्या रस्त्यावरच अनधिकृतपणे संरक्षक भिंत, पत्राशेड असलेले कार्यालय, वीट बांधकामाच्या भिंतीसह वर पत्रे टाकलेले दोन वर्ग, एक पत्रा शेडची खोली उभारली होती.
हे अतिक्रमण काढून टाकण्याबाबत या शाळेला महापालिकेकडून यापूर्वी नोटीस देण्यात आली होती, मात्र शाळेने स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले नाही. यामुळे मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी संबंधितांकडून मोठा विरोधी झाला होता. दरम्यान, शाळेने केलेले इतर अतिक्रमण काढून टाकण्यास महापालिकेकडून शाळेला दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु मुदतीत अतिक्रमण न काढल्याने महापालिकेकडून पुन्हा कारवाई केली.
यावेळी एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे एकूण ५० पोलीस आणि सात अधिकारी तैनात होते. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, या विभागाचे अधीक्षक हेमंतकुमार डोंगरे आणि बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण, सहाय्यक अभियंता इर्शाद जरतार, कनिष्ठ अभियंता प्रमोद गोविंदवार, गणेश काकडे, सलमान शेख उपस्थित होते होते.








