एकाच वृत्तपत्रात अनेक वर्ष एकनिष्ठपणे पत्रकारिता करणे हे आदर्शवत: आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

Prashant Joshi: आदर्श पत्रकार पुरस्काराने प्रशांत जोशी यांचा गौरव

0

सोलापूर,दि.१६: SMC Commissioner Sachin Ombase On Reporter Prashant Joshi: एकाच वृत्तपत्रात अनेक वर्ष एकनिष्ठपणे पत्रकारिता करणे हे आदर्शवत आहे. एकनिष्ठता महत्त्वाची आहे असे सांगून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे (Sachin Ombase) यांनी पत्रकार प्रशांत जोशी (Prashant Joshi) यांच्या कार्याचा गौरव केला.

सोलापूरला पत्रकारितेचा मोठा इतिहास आणि वारसा आहे. पत्रकार अभ्यास करून सखोल पद्धतीने प्रश्न मांडतात. विविध प्रश्नांच्या मुळाशी जाणारी पत्रकारिता ही आज महत्त्वाची आहे. यामुळे प्रश्न मार्गी लागतात. विकासाला पूरक असे काम पत्रकारितून घडते, असे प्रतिपादन डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

मंगळवारी, श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पहिला आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी यांना महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत रवींद्र मोकाशी, कुलकर्णी यांच्या पत्नी नीता कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सत्काराला उत्तर देताना प्रशांत जोशी म्हणाले, अविनाश कुलकर्णी यांची तत्त्वनिष्ठ, निस्वार्थी पत्रकारिता आदर्शवत आहे. त्यांचे पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नावे पुरस्कार मिळाला, हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

प्रारंभी  कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. यावेळी प्रा. बाळासाहेब भास्कर, अविनाश सिताराम कुलकर्णी, प्रशांत बडवे, अरुण लोहकरे, ॲड. जयदीप माने, पद्माकर कुलकर्णी, विजय शाबादे, आणि कुलकर्णी मित्र परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

माणसांचे दुःख वास्तवपणे मांडणारी पत्रकारिता आवश्यक : मोकाशी 

ज्येष्ठ विचारवंत रवींद्र मोकाशी म्हणाले, राज्य कुणाचे का असेना परंतु सर्वसामान्य लोकांच्या संवेदना व्यक्त होण्याचे पत्रकारिता एक चांगले साधन आहे. जागतिकीकरणात आजची पत्रकारिता भरकटताना दिसते आहे, अशाही परिस्थितीत माणूस आणि माणुसकी जिवंत ठेवणारे पत्रकार आजही आहेत. माणसांची दुःखे, अडचणी नेमक्या वास्तवपणे मांडणारी पत्रकारिता आवश्यक आहे, असे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here