कोलकाता,दि.19 : मसाज सेंटरच्या नावाखाली चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलीस अनेकदा कारवाई करतात. या कारवाईत ग्राहकांनाही आरोपी केले जाते. केवळ लैंगिक सुखासाठी वेश्यालयात जाणारा ग्राहक अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी जबाबदार धरला जाऊ शकत नाही, असा निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाने दिला आहे.
एका मसाज सेंटरमध्ये एनआरआय व्यावसायिक सुरेश बाबू 4 जानेवारी 2019 रोजी गेले होते. या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी छापा टाकला. बाबू, आणखी एक पुरुष व 8 महिलांना छाप्यात पकडण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी वेश्यागृह चालवणे, व्यावसायिक हेतूने लैंगिक शोषण आणि वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईवर गुजराण केली म्हणून त्यांच्या विरुद्ध अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे नोंदवत पोलिसांनी या सर्वांना अटक केली. पुढे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
व्यावसायिक सुरेश बाबू यांचा दोषमुक्त करण्याचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर बाबूंनी केस रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. व्यावसायिक हेतूने एखाद्या व्यक्तीचे लैंगिक शोषण करणे, त्यास उपजीविकेचे साधन बनवणे आणि आपल्या जागेचा वापर वेश्यालयासाठी करण्याची परवानगी देणे हे अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत शिक्षेस पात्र गुन्हे आहेत. ग्राहकाचा समावेश यामध्ये होत नाही. वेश्यागृहात ग्राहक म्हणून जाणे हे वारांगनांच्या कमाईवर जगणे ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवून हायकोर्टाने गुन्हा रद्द केला.
कर्नाटक उच्च न्यायालय
यापूर्वी एप्रिल 22 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालय आणि मे 22 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायातील ग्राहकास अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपी करता येत नाही असा निर्णय दिला आहे.