नवी दिल्ली,२७: नवी दिल्लीत २६ मे रोजी काँग्रेस हायकमांडने कर्नाटकच्या दोन्ही बड्या नेत्यांसोबत दिवसभर खलबते केली. या हायव्होल्टेज बैठकीसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे दोघेही आपल्या समर्थक आमदारांसह दिल्लीत दाखल झाले होते. केंद्रीय नेतृत्वासोबत झालेल्या या मुख्य बैठकीनंतर, सिद्धरामय्या यांनी तातडीने आपल्या निकटवर्तीय मंत्र्यांसोबत एक स्वतंत्र बैठक घेतली. या अंतर्गत बैठकीमुळे कर्नाटकातील सत्ता बदलाच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
हायकमांडचा ‘राजीनामा’ फॉर्म्युला आणि ऑफर (Siddaramaiah to Resign)
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत विस्तृत चर्चा झाली. यानंतर राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांच्यात जवळपास अर्धा तास वैयक्तिक चर्चा झाली. सूत्रांच्या हवाल्यानुसार, काँग्रेस नेतृत्वाने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नेतृत्वबदलाचा मार्ग मोकळा करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, यासाठी त्यांना कोणतीही कडक कालमर्यादा (Dead Line) घालून देण्यात आलेली नाही.
सिद्धरामय्या यांनी मानाने पद सोडावे यासाठी पक्षाने त्यांच्यासमोर अनेक पर्याय ठेवले आहेत. यामध्ये त्यांना केंद्रात म्हणजेच राज्यसभेवर पाठवण्याचे प्रमुख आश्वासन देण्यात आल्याचे समजते. या संपूर्ण विषयावर राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांच्यात आणखी एक अंतिम बैठक होणार असून, त्यानंतरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार संघर्ष आणि जुना करार (Siddaramaiah vs D K Shivakumar)
कर्नाटकात २०२३ मध्ये काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. सरकार स्थापनेला आता जवळपास तीन वर्षे पूर्ण होत आली आहेत, परंतु सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही गटांतील अंतर्गत गटबाजी आणि तणाव अद्याप शमलेला नाही.
शिवकुमार यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की, २०२३ मध्ये जेव्हा सरकार स्थापन झाले, तेव्हा हायकमांडने दोन्ही नेत्यांना अडीच-अडीच वर्षे आळीपाळीने मुख्यमंत्रिपद (Power Sharing Formula) देण्याचे आश्वासन दिले होते. जरी काँग्रेस हायकमांडने या सूत्राला जाहीरपणे कधीही दुजोरा दिला नसला, तरी सध्या दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडी पाहता कर्नाटकात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.





