सोलापूर,दि.3: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने 50 लाखांचे जीवनावश्यक धान्य किट तर अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने १ हजार महिलांना साडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अरविंद शिंदे हे उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या आहावानानुसार बाधित नागरिकांना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार जीवनावश्यक धान्य किट तर हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या, संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक सचिवा अर्पिताराजे भोसले, यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त महिलांसाठी 1 हजार साडी चोळीचे वाटप पूरग्रस्ताना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
न्यासाचे सचिव शामराव मोरे म्हणाले, जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोलराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे धर्मादाय न्यास गेली ३८ वर्षे अन्नदानाचे कार्य सातत्याने करीत सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रिडा व पर्यावरण पुरक असे नानाविध उपक्रम सदैव राबवित असते, तसेच पूरग्रस्त, जळीतग्रस्त, भूकंपग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देत असते. शासनाचेज्ञविविध उपक्रम राबविण्यात व शासनास सहकार्य करण्यात हे धर्मादाय न्यास सदैव अग्रेसर असते . अतिवृष्टीमुळे अनेक तालुके बाधित झाले असून, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अन्नछत्र मंडळ आणि हिरकणी संस्थेकडून ही मदत देण्यात येणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.








