‘…आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?’ आमदार रोहित पवार

0

मुंबई,दि.8: राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. 

ईडीने 50.20 कोटी रुपयांची मालमत्त जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी कारवाईबाबात प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांची पोस्ट

माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत!

या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय. असे रोहित पवार यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here