Salman Khan Salim Khan: सलमान खान आणि सलीम खान धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा

0

मुंबई, दि.१०: Salman Khan Salim Khan: सलमान खान आणि सलीम खान धमकी प्रकरणात आरोपी सौरभ महाकालनं धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मुंबई क्राइम ब्रांचनं काल पुण्यात जाऊन महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश हिराम कांबळे याची चौकशी केली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात संशयित आरोपी म्हणून त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सलमान खानला आलेल्या धमकी पत्राबाबत महाकाल याची चौकशी केली असता त्यानं धक्कादायक खुलासा केला असल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खान याला धमकी देऊन बॉलीवूड विश्वात भीती निर्माण करण्याचा उद्देश होता. जेणेकरुन बड्या कलाकारांकडून खंडणी वसुल करता येईल, असं महाकाल यानं पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबुल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महाकाल याच्या कबुली जबाबानुसार सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खानला धमकीचं पत्र देण्यामागे बॉलीवूड विश्वातून खंडणी वसुल करण्याचा हेतू होता. 

धमकीच्या पत्रातून बॉलीवूडमध्ये भीती निर्माण करण्याचा इरादा होता असा खुलासा महाकाल यानं केला आहे. खंडणीसाठीची रक्कम मिळाली असती तर पुढची रणनिती आखली गेली असती जेणेकरुन बॉलीवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करता आलं असतं. याचा मास्टरमाईंड हनुमानगढचा विक्रम बरार होता. जो लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार यांचा खूप जवळचा साथीदार आहे. बॉलीवूडमध्ये खंडणीखोरीचं जाळं सुरू करण्यासाठी प्रत्येक गोष्ट यानंच प्लॉट केली होती असाही खुलासा महाकाल यानं केल्याचं समजतं. 

सुत्रांच्या माहितीनुसार विक्रम बरार याच्या प्लानला खुद्द गोल्डी बरार यानंच हिरवा कंदील दाखवला होता. यानुसार विक्रम बरार यानं बॉलीवूडमधील खंडणीखोरीची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानं या कामासाठी राजस्थानमधील तीन लोकांची निवड केली होती. ज्यांची महाकाल याच्यासोबत कल्याण रेल्वेस्थानकात भेट झाली होती. सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पत्र कसं पोहोचवता येईल याचं संपूर्ण प्लानिंग यांनीच केलं होतं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here