मुंबई,दि.५: क्रूझ ड्रग पार्टीवर मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कारवाई केली. कारवाई केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले. अशातच क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार किरण गोसावीच्या बॉडीगार्ड प्रभाकर साईलने या प्रकरणात आर्यन खानवर कारवाई न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती दिली. तडजोडी अंती १८ कोटींवर डील झाली व त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते असे सांगून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे याप्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. एसआयटी मार्फत याची चौकशी सुरू करण्यात आली.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खंडणीच्या आरोपाबाबत मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून याआधारे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात किरण गोसावी याच्याबाबत महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले असून गुन्हा दाखल होताच त्याला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याच प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिचा जबाबही नोंदवून घेतला जाणार असून तिला समन्स पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचे सूचक ट्विट रविवारी करणार मोठा गौप्यस्फोट
आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं तर ३ ऑक्टोबर रोजी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या दरम्यान आर्यनवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, त्याच्यावर अटकेची कारवाई होऊ नये, यासाठी बऱ्याच घडामोडी घडल्याचे आता समोर येऊ लागले आहे. २ तारखेच्या मध्यरात्रीनंतर घडलेल्या घडामोडींचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी, क्रूझ ड्रग्ज पार्टीतील पंच साक्षीदार किरण गोसावी, त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल तसेच ददलानी व गोसावी यांच्यातील मध्यस्थ सॅम डिसूझा यांच्याबाबत महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
लोअर परळच्या बिग बाझारजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यात पूजा ददलानी यांची मर्सिडीज कार, गोसावीची इनोव्हा आणि सॅम डिसूझाची इनोव्हा दिसत आहेत. मर्सिडीजमधून एक महिला उतरली आणि गोसावीशी काहीतरी बोलून काही वेळातच निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही महिला म्हणजे पूजा ददलानी होती की अन्य कोणी, हे स्पष्ट झालेले नाही. गंभीर बाब म्हणजे गोसावीच्या इनोव्हा कारवर पोलीस अशी पाटी दिसत आहे. त्यामुळे तो पुरता अडकण्याची चिन्हे आहेत. खंडणी वसुली तसेच पोलीस पाटीचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी पूजा ददलानीचे या प्रकरणात थेट नाव येत असल्याने जबाब नोंदवण्यासाठी तिला समन्स बजावले जाण्याचीही शक्यता आहे.