मुंबई,दि.10: शिवसेनेने (Shivsena) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरे अधिक सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. तसेच बंडखोर आमदारांवर कारवाया करण्याचे सत्र सुरूच असून, आता बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तानाजी सावंत यांनी जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली होती. तर सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निवडीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर शिवसेनेकडून 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. मात्र, यावरून शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. याची सुनावणी 11 जुलै रोजी आहे. यानंतर आता तानाजी सावंत यांच्यावर थेट पक्षप्रमुखांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे.