एकनाथ शिंदे यांचा रामदास आठवले होणार

0

मुंबई,दि.23: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र दैनिक सामना रोखठोक मधून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, “शिंदे यांचा रामदास आठवले होईल.’ असा खुलासा शिवसेनेनं केला आहे.

शिंदे गटाने शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहे. पण, मुख्यमंत्री हे नाराज असल्याचे बोलले जात आहे, याच मुद्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून राज्यपालांवर आणि शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीसही फडणवीस एकनाथ शिंदेंशिवाय जातात, असा टोलाही सेनेनं लगावला.

‘मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, “शिंदे यांचा रामदास आठवले होईल.’’ हे विधान बोलके आहे’ असा दावाच शिवसेनेनं केला आहे.

तसंच, एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, “शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.’’ असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले. धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस व भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत’ अशी टीकाही सेनेनं केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here