औरंगाबाद,दि.21: शिवसेनेचे (Shivsena) औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve) गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. अनेक महापालिकेतील नगरसेवकही शिंदे गटात सामिल झाले आहेत. पदाधिकारी व कार्यकर्तेही सामिल होत आहेत. लोकसभेचे खासदारही शिंदे गटात सामिल झाले आहेत. प्रलोभनाला बळी पडून अनेकजण जात आहेत, असे सांगितले जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांनी (MLA Ambadas Danve) शिंदे गटाने ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. औरंगाबाद शहरातील आमदार शिंदे गटामध्ये सामील झाले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या समोर एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांचा मलादेखील फोन आला होता पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, असं उत्तर दानवेंनी दिलं.
‘मला एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. मी त्यांना सांगितलं मी, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांनी मला तुला मदत केली असल्याचे सांगितले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्ही पक्ष म्हणून मदत केली, स्वतः व्यक्तिगत नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे होते म्हणून तुम्ही मदत केली. त्यामुळे तुम्ही देखील भूलथापांना बळी पडू नका, असे देखील पदाधिकाऱ्यांना दानवे यांनी सांगितले आहे.
आपल्या येथील काही आमदार तुम्हाला सांगतील, तुमच्यासाठी हे केलं, ते केलं. पण त्याला सांगा तुला निवडून मी आणलंय. तुला निवडून येण्यासाठी आम्ही काम केलं, असं सांगा, असं आवाहन दानवे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
‘कुठल्याही गद्दाराची आठवण येणार नाही, एवढी जनता आपल्यासोबत आहे. कुणाची आठवण येण्याची गरजही नाही. कुणी म्हणेल तुमच्यासाठी इतकं काम केलं आहे, पण शिवसेना होती म्हणून तुम्ही ते काम केलं होतं बाकी, काही नाही, असा टोलाही दानवे यांनी बंडखोर आमदारांना लगावला.