Swapnali Sawant: शिवसेनेच्या नेत्या स्वप्नाली सावंत 10 दिवसांपासून बेपत्ता

0

रत्नागिरी,दि.10: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या आणि पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत (Swapnali Sawant) 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी संशयित म्हणून शिवसेना उपतालुकाप्रमुख असलेल्या त्यांच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. या प्रकरणात पोलिसांना घातपाताचा संशय असून त्यांनी त्या दृष्टीने तपासाला वेग दिला आहे. त्या अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख असलेले सुकांत सावंत यांची देखील पोलिसांनी चौकशी केली मात्र अजून कोणताही उलगडा झालेला नाही. पती सुकांत सावंत यांनी दिलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांचा शोध सुरू केला आहे. दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्या होत्या. सुकांत सावंत आणि त्यांच्या पत्नी स्वप्नाली सावंत यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद निर्माण झाले आहेत. अनेकवेळा हा वाद चव्हाट्यावर देखील आला.

तसंच पोलीस स्थानकात वेगवेगळ्या तक्रारीवरून गुन्हे देखील दाखल झाले आहेत. परंतु, त्या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे पती सुकांत सावंत यांनीच नोंदवली आहे, त्यामुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारणमागे नेमके कारण काय आहे याचा पोलीस शोध घेत असून काही लपवले तर जात नाहीना अशी शंका पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.

स्वप्नाली सावंत यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली असून श्वानपथकाची मदत देखील पोलिसांनी घेतली आहे. मिऱ्यावरील त्यांच्या राहत्या घराजवळचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. पण अजूनही काही उलगडा पोलिसांना झालेला नाही. परंतु येत्या काही दिवसातच या प्रकरणाचा उलगडा होण्याची दाट शक्‍यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here