राज्यपालांनी लोकशाहीचा मान आणि इज्जत राखली: शिवसेना नेते भास्कर जाधव

0

मुंबई,दि.3: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उपरोधीक टोलेबाजी केली आहे. “त्यांनी लोकशाहीचा मान आणि इज्जत राखली”, म्हणत भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, “आज जी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी राज्यपाल महोदयांना धन्यवाद देतो. या निवडणुकीचं श्रेय त्यांना देतो. गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ‘आम्हाला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ द्या’ अशी मागणी करत होते. पण राज्यपालांनी ही मागणी मान्य केली नाही. आता दोनच दिवसांपूर्वी जे सरकार अस्तित्वात आलं, त्यांना मात्र ताबोडतोब अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याची परवानगी राज्यपाल महोदयांनी दिली. राज्यपाल महोदयांनी घटनेची बूज चांगल्याप्रकारे राखली. लोकशाहीचा मान आणि इज्जत त्यांनी राखली आहे. त्यामुळे आजची निवडणूक पार पडली. यामुळे मी राज्यपालांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो,” अशा शब्दांत भास्कर जाधवांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उपरोधीक टोलेबाजी केली आहे.

सुनील प्रभू हेच अधिकृत प्रतोद

सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचं शिंदे गटाच्या आमदारांकडून पालन न झाल्याबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “सुनील प्रभू (Sunil Prabhu) हेच अधिकृत प्रतोद आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी शिवसेनेचे विधीमंडळातील अधिकृत प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांना बोलण्याची संधी दिली. झिरवळ यांची नियुक्ती महाविकासा आघाडी सरकारकडून करण्यात आली होती. पण नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील अधिकृत प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनाच बोलण्याची संधी दिली,” असंही जाधव म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here