नवी दिल्ली,दि.19: शिवसेनेने (Shivsena) खासदार बाहेर पडण्याच्या आधीच मोठे पाऊल उचलले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. त्यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. त्या नंतर अनेक महापालिकेतील नगरसेवकही शिंदे गटात सामिल झाले आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शिवसेना आमदारांनंतर आता खासदारांनीही पक्षाच्याविरोधात पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होऊ शकतात. सोमवारी शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याची बातमी समोर आली. त्यानंतर तातडीनं दिल्लीत हादरा बसण्यापूर्वी शिवसेना सज्ज झाली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलंय की, लोकसभा शिवसेना पक्षाकडून माझी संसदीय नेता आणि राजन विचारे यांची मुख्य प्रतोदपदी नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या कुठल्याही खासदाराकडून कुणाची प्रतोदपदी नियुक्ती केली जात असेल तर त्यास मान्यता देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचसोबत जर कुणी खासदार शिंदे गटात सहभागी झाले तर त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागेल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत असून समर्थक शिवसेना खासदारांसह ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर शिवसेनेचे 12 खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.