निवडणूक आयोगासमोर शिवसेनेची मोठी खेळी, धनुष्यबाण चिन्ह कुणाला?

0

मुंबई,दि.7: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपले म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेना नेमकी कोणाची या शिंदे आणि ठाकरे गटातील वादातला महत्तवाचा मुद्दा असणाऱ्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता हा निकाल पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण चिन्हावर निर्णय होईल. हे चिन्ह दोन पैकी एका गटाला मिळेल किंवा ते गोठवले जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकला आहे, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, शिवसेनेचा ठाकरे गट आज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारणीतील 180 सदस्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. शिवसैनिक आणि पदाधिका-यांची प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ठाकरे गट आणखी काही कालावधी मागून घेणार आहे.

सध्या शिवसैनिक आणि पदाधिका-यांची अडीच लाख प्रतिज्ञापत्र तयार असून ती दिल्लीत पोहोच झालेली आहेत. परंतु आणखी 50 हजार प्रतिज्ञापत्रे मुंबईतून येत असल्याच्या कारणास्तव शिवसेना आणखी कालावधी मागून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांची प्रतिज्ञापत्रे आजच निवडणूक आयोगाला दिली जाणार आहेत. कार्यकारणीमध्ये शिवसेना नेते, उपनेते, सचिव, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार, विभागप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांचा समावेश होतो.

शिंदे गटाकडूनही धनुष्यबाणाबाबत आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा नसल्यानेच निवडणूक आयोगाने पुरेशी कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस काढूनही वारंवार मुदत वाढवून मागत आहेत, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here