मुंबई,दि.२२: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाबाबत (Eknath Shinde Group) मोठं विधान केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम सुरू आहे. ते सगळेजण एकत्र येत आहेत. पण संघर्ष झाला किंवा रक्तपात झाला तर आपल्यात आणि त्या गद्दारांमध्ये होईल, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात कारभार कसा चालू आहे? हे कुणालाच माहीत नाही. ते फक्त शिवसेनेला बदनाम करण्याचं आणि शिवसेनेला संपवण्याचं काम करत आहेत. सगळेजण एकत्र येतात. पण सगळे मिळून एकत्र अंगावर आले तरी आसमान काय असतं ते आम्ही त्यांना दाखवू. पण तुमच्या लक्षात आणून देतो की तुमची ताकद किती आहे, हे तुम्हाला कळालं नाही. पण आपल्या विरोधकांना कळालं आहे.
ते केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहेत. आपल्या काही गद्दारांना त्यांनी सोबत घेतलं आहेत. मुन्नाभाईला सोबत घेतलं आहे. उद्धव ठाकरेला आणि ठाकरे कुटुंह संपवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. पण येथे बसलेलेच माझं कुटुंब आहे, हेच माझं ठाकरे कुटुंब आहे. कारण येथे बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेली असतील, पण माझ्या शिवसैनिकांची मनं मेली नाहीत. त्यांची मनगटं झिजली नाहीत, अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेना पक्ष म्हणजे रस्त्यावर पडलेलं झुरळ किंवा ढेकूण नाही, कुणीही आला आणि चिरडून गेला. शिवसेनेच्या वाटेला येण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहात, पण मी सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. कारण संघर्ष झालाच किंवा रक्तपात झालाच, तर हा रक्तपात आपल्यात आणि त्या गद्दारांमध्ये होईल. ते गद्दार आहेत. गद्दारांच्या अंगात गद्दारांचंच रक्त असतं, पण रक्तपात हा शिवसैनिकांचा होईल. कमळाबाईचे कपडे मात्र साफ राहतील, त्यांचा हा डाव मला साधू द्यायचा नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.