दीपक केसरकर यांचा शरद पवारांवर शिवसेना फोडल्याचा आरोप, शिवसेनेने केली जोरदार टीका

0

दि.१५: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप केले होते. शिवसेनेत (Shivsena) आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शिवसेना (Shivsena) फोडल्याचा आरोप करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना शिवसेनेनंच खडे बोल सुनावले आहेत. केसरकर यांनी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली असतानाच आता या वादामध्ये उद्धव ठाकरेंना समर्थन करणाऱ्या मूळ शिवसेनेनं उडी घेतलीय.

दीपक केसरकर यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेैनं ‘सामना’च्या माध्यमातून टोला लगावला आहे. राज्यामध्ये शिंदे आणि भाजपा युतीच्या सरकारचं मंत्रीमंडळ अद्याप स्थापन झालेलं नसल्याच्या मुद्द्यावरुन टीका करताना केसरकरांच्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आलाय. शिवसेनेनं, “केसरकर हे खाल्ला घरचे वासे मोजणारे आहेत,” असं म्हटलंय. तसेच उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्र्यांना दगा देणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये केसरकरांचा क्रमांक सर्वात वरचा असल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय.

“महाराष्ट्रात नवे सरकार आले की गेले तेच कळत नाही. फुटीर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे व भाजपातील राणे गटाचे भांडे आताच खडखडू लागले आहे. सावंतवाडीच्या केसरकरांनी शरद पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा आरोप करून स्वतःच्याच बनियनमध्ये खळबळ माजवली आहे. केसरकर हे खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेत. त्यांचा राजकीय प्रवास तेच सांगतो. उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला.’ त्यात केसरकरांचा नंबर सगळ्यात वर,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

दीपक केसरकर म्हणाले

“मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे”, असं केसरकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही असं सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती,” असंही केसरकर मुलाखतीत म्हणाले.

“त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. ‘मातोश्री’ कधी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं,” असंही केसरकरांनी म्हटलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here