बुलढाणा,दि.३: शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करत गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत सत्तांतर घडवून आणले. शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार शिंदे गटात गेले. आता खरी शिवसेना आमचीच असा दावा उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे या दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. दोन्ही गटाने आपापले पदाधिकारी नेमण्यास सुरूवात केली आहे. त्यात बुलढाण्यात शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे तुफान राडा झाला.
शिवसेना आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात अचानक प्रवेश करत गोंधळ घातला. ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. काही पदाधिकाऱ्यांना यात मारहाण झाली. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या उपस्थित घडला. पोलिसांनी या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते.