पटियाला,दि.29: पंजाबमधील (Punjab) पटियाला येथे शिवसेनेने काढलेल्या खलिस्तान मुर्दाबाद मोर्चादरम्यान परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आणि अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले, त्यानंतर संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. दोन्ही बाजूंनी तलवारीही उपसण्यात आल्या आणि दगडफेकही झाली. मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, पटियाला येथील संघर्षाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी डीजीपीशी बोललो, परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि कोणालाही राज्यात अशांतता निर्माण करू देणार नाही. पंजाबची शांतता आणि सद्भावना सर्वात महत्त्वाची आहे.
पंजाबमधील शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हशिष सिंगला यांच्या नेतृत्वाखाली आर्य समाज चौकातून खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा निघाला. खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनिक बाहेर पडले. हरीश सिंगला म्हणाले की, शिवसेना पंजाबमध्ये कधीही खलिस्तान होऊ देणार नाही आणि खलिस्तानचे नाव घेऊ देणार नाही. दरम्यान, काही शीख संघटनाही तलवारी घेऊन रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि दगडफेकही झाली.
या मोर्चामधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये लोक तलवारी उपसून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. काहीजण पोलिसांशी वाद घालत आहेत तर काही दगडफेक करताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंदिराच्या बाजूच्या इमारतीवर उभी राहून खाली जमलेल्या लोकांवर दगडफेक करताना दिसत आहे.
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याचेही बोलले जात आहे. डीसी पटियाला साक्षी साहनी यांनीही शांतता आणि सौहार्दाची भावना व्यक्त केली. काही वाद किंवा गैरसमज असतील तर ते संवादातून सोडवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत मी पटियाला जिल्हा प्रशासन आणि पंजाबमधील सर्व बंधू-भगिनींना शांतता आणि बंधुभाव राखण्याचे आवाहन करते. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून, त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. निराधार बातम्या/सोशल मीडिया फॉरवर्डच्या फंदात पडू नये आणि आपापल्या घरी आणि मुक्कामाच्या ठिकाणी परत जाण्याची विनंतीही त्यांनी केली.