मुंबई,दि.18: शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीनी आत्महत्या केली आहे. मुंबईतील कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर (Rajni Kudalkar) असं त्यांचं नाव आहे. त्या 42 वर्षाच्या होत्या.
नेहरूनगर येथील केदारनाथ मंदिर परिसरामध्ये कुडाळकर राहतात. रविवारी सायंकाळी सरवजन घरात असतानाच त्यांच्या पत्नी रजनी यांनी स्वत:च्या बेडरुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. रजनी या मंगेश यांच्या द्वितीय पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी मंगेश यांच्या पहिल्या पत्नीचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांनी रजनी यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत. वर्षभरापूर्वी मंगेश यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचा कुर्ल्यामध्ये अपघाती मृत्यू झाला होता.
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी पाटील यांनी आत्महत्या केल्याचं कळताच मुंबई पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रजनी कुडाळकर यांचा मृतदेह पोलिसांनी राजावाडी पोलिस स्थानकात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
रजनी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं यासंदर्भातील माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी त्यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सह पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांना महिलेने गळफास घेतल्याची माहिती कॉलवर मिळाली होती.
आमदाराच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना तोंड फुटलं आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पंचनामा आणि चौकशी करत होते. या प्रकरणासंदर्भात नेहरूनगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.