रायगड,दि.3: शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या गाडीचा शनिवारी भीषण अपघात झाला. महेंद्र दळवी यांच्या गाडीला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. रायगड जिल्ह्यामधील उसडी गावातील टोल नाक्याजवळील तळारोड या परिसरात हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. महेंद्र दळवी यांच्या गाडीच्या चालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुड -अलिबाग मतदारसंघाचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत. शनिवारी ते मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी उसडी गावानजीकच्या टोलनाक्याच्या परिसरात महेंद्र दळवी यांची गाडी आणि जासीम अब्दुल रहेमान पासवारे या व्यक्तीच्या दुचाकीची जोरदार धडक झाली.
यामध्ये जासीम अब्दुल रहेमान पासवारे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर आमदार दळवी यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.