नवी दिल्ली,दि.21: शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचा निकाल दिला. तसेच शिंदे गटाचे भरत गोगावले हेच पक्षाचे प्रतोद असल्याचा निकाल दिला.
ठाकरे गटाने शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र करण्याची केलेली मागणी फेटाळण्यात आली. शिंदे गटानेही ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र करण्याची केलेली मागणी फेटाळण्यात आली. राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात तर शिंदे गट उच्च न्यायालयात गेला आहे.
ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याच प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टात येत्या 22 जानेवारीला सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिकेवर सुनावणी होणार आहे. हे प्रकरण शिवसेना आमदार अपात्रताशी संबंधित आहे. त्यामुळे या सुनावणीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोमवारी कोर्टाने सुट्टी जाहीर केली नसल्याने सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण 20 नंबरवर आहे, अशी माहिती समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांच्या नेतृत्वातील सरकार कोर्टाच्या आदेशाने मिळू शकलं असतं, असं कोर्टाने म्हटलं होतं. पण विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती वैध ठरवली आहे. त्यांनी यासाठी कायदेशीर बाजूदेखील मांडल्या आहेत. त्यांच्या बाजूने कोर्टात काय युक्तिवाद केला जातो आणि सुप्रीम कोर्टा त्यावर काय निरीक्षण नोंदवतं ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.








