Maharashtra: शिवसेना आमदाराने देवेंद्र फडणवीस आणि इम्तियाज जलील यांचा फोटो शेअर करत केली टीका

0

दि.२०: Maharashtra: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने भाजपाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीबरोबर एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. AIMIM चे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्यात एक बैठक झाल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची ऑफर दिली होती. एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन लढण्याची ऑफर दिली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. जलील यांच्या या प्रस्तावामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण जुळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांनी एमआयएमला जातीयवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीचा पक्ष म्हणत भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी शिवसेना जोडली जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

त्यानंतर अंबादास दानवे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि खासदार इम्तियाज जलील यांचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. यामध्ये “जलील फडणवीसांना म्हणत आहे की, मी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो. त्यावर फडणवीस म्हणत आहेत की, मग मी लगेच ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदुत्वाच्या गप्पा मारतो,” असे बोलत असल्याचे म्हटले आहे.

युतीच्या ऑफरनंतर अंबादास दानवे यांनी जलील यांच्यासह एमआयएमवर जोरदार टीका केली होती. “एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे. भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी आम्ही कसे जोडले जाणार? औरंगजेबासमोर हे लोक गुडघे टेकतात. अशा संघटनेशी शिवसेना कधीही जोडली जाणार नाही. भगव्याला विरोध करणारी संघटना आहे. या विचारांशी शिवसेना कधीही तडजोड करू शकत नाही आणि या प्रस्तावाचे शिवसेनेला कोणतेही देणेघेणे नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले होते.

तर फडणवीसांचाच हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपाची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here